मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren death case) मोठी अपडेट समोर आली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने ताब्यात घेतला आला आहे. यापूर्वी हा तपास दहशतवादी विरोधी पथक (ATS) करत होता.
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी मनसुख हिरेन यांचीच होती. मात्र त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ATS करत होती. मात्र आता हा तपास NIA ने आपल्या ताब्यात घेतला आहे.
स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणाचा तपासही NIA करत आहे. याप्रकरणी आधीच सचिन वाझे यांना अटक झाली आहे. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते, मात्र केंद्र सरकारने तो NIA कडे सोपवला.
दरम्यान अंबानींच्या घरासमोरील कारमधली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरलेलं आहे. विधिमंडळ अधिवेशन काळातही विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला. राणे कुटुंबियांनी शिवसेनेवर आरोपही केले. तसंच हा तपास NIA नेच करावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली.
आता या दोन्ही प्रकरणांचा तपास NIA कडे सोपावण्यात आल्याने ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र हा निर्णय स्वागतार्ह असून लवकरच सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरण NIA कडे वर्ग करण्यात आलं, ही निश्चितचं स्वागतार्ह बाब आहे. प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा होऊन सत्य बाहेर येईल.#SachinVaze @NIA_India @BJP4Maharashtra pic.twitter.com/NxHsHxOfOl
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021