औरंगाबाद: मराठा आंदोलनादरम्यान गुरुवारी मोर्चेकऱ्यांनी केलेल्या नासधुसीमुळे औरंगाबादमधील उद्योजक आक्रमक झाले आहेत. या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी वाळूज येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शहरातील जवळपास १००० उद्योजकांनी हजेरी लावली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आंदोलकांनी वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांची आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले आहे. औद्योगिक परिसरातील ६० हून अधिक मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कंपनीची सुरक्षा व्यवस्था तोडून आंदोलक आतमध्ये शिरले व त्यांनी नासधुस केली. याशिवाय, आंदोलनादरम्यान उद्योग बंद राहिल्यानेही मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येऊन नुकसानीची पाहणी करावी. प्रशासन जर सुरक्षा देवू शकत नसेल तर कंपन्या किती दिवस बंद ठेवाव्यात, असा सवाल उद्योजकांनी विचारला आहे. दरम्यान, या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी सुमारे वीस ते पंचवीस संशयितांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींची शोध सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे घेतला जात आहे.