Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घरं असाव अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, या महागाईच्या काळात व घरांच्या वाढलेल्या किंमतीपाहून मुंबईपासून लांब घर खरेदी करण्याचा विचार सर्वसामान्य माणूस करतो. मात्र, आता लवकरच तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून लवकरच लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळासाठी लॉटरीची जाहिरात काढण्यासाठी सर्व प्रक्रिया झाली असून लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळं 8 ऑगस्टला 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
म्हाडा विक्रोळी, गोरेगाव, पवई आणि अँटोप हिल येथील घरांसाठी लॉटरी काढणार आहे. एकूण 2,030 घरे असून अचारसंहिता लागण्यापूर्वी लॉटरीची तारीख जाहिर होण्याची शक्यता आहे. तसंच, लॉटरीची तारीख जाहिर झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरपर्यंत सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या या घरांची किंमत किती असेल व कोणत्या गटासाठी कोणाला अर्ज करता येऊ शकेल, याची सर्व माहिती आज जाणून घ्या. यंदा काढण्यात येणाऱ्या लॉटरीसाठी मध्यम आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे आहेत. तर, अत्यल्प गटासाठी कमी घरे असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उच्च वर्गासाठीही काही घरे आहेत. गोरेगाव येथे 3 BHK घर असून त्यांचा समावेश 2024च्या लॉटरीत केला जाणार आहे.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदारांना पूर्णपणे ऑनलाइनच अर्ज भरायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या संकेतस्थळावर लॉटरीसंदर्भात अपडेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाने मोबाइल अॅपदेखील सुरू केलं आहे. त्याद्वारेही तुम्ही रजिस्टर करु शकता. रजिस्टर पूर्ण झाल्यानंतर अर्जदार म्हाडा लॉटरी 2024साठी अर्ज करु शकणार आहेत. लवकरच Mhada Lottery 2024 लाइ्व्ह होणार आहे.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EWS गटातील घरांच्या किंमती साधारण 30 लाखांपासून सुरू होत आहेत. तर, 3 BHK घरं उच्च गटातील असून या घरांची किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. 3 बीएचके घरांच्या किंमती अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटींच्या आसपास या घरांच्या किंमती असू शकतात.
-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असेल त्यांना EWS (अल्प गटा)साठी अर्ज करता येणार आहे.
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख ते 9 लाखांपर्यंत आहे त्यांना LIG (अत्यल्प गट)साठी अर्ज करता येणार आहे.
- कौटुंबिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाखापर्यंत आहे ते MIG (मध्यम गट)साठी अर्ज करता येणार आहे.
- कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना HIG (उच्च गट)साठी अर्ज करता येणार आहे.
पती आणि पत्नी या दोघांचे वार्षिक उत्पन्न मिळून कुटुंबाचे उत्पन्न धरले जाते. व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.