दारु प्यायला बोलवून शेजाऱ्याची केली हत्या! मृतदेह चादरीत गुंडाळून त्याच्याच घरातच लपवला

Delivery Boy Killed Neighbour: मयत व्यक्तींच्या घरी काही कामानिमित्त इमारतीमधील लोक गेले असता त्यांना घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. यानंतर पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली आणि पुढे या हत्येचा खुलासा झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2023, 01:31 PM IST
दारु प्यायला बोलवून शेजाऱ्याची केली हत्या! मृतदेह चादरीत गुंडाळून त्याच्याच घरातच लपवला title=
हत्या करणारा तरुण डिलिव्हरी बॉय आहे (प्रातिनिधिक फोटो)

Delivery Boy Killed Neighbour: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. चर्चगेटमधील हॉस्टेलमधील विद्यार्थीनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणानंतर मीरा रोडमध्ये लिव्हइन पार्टनरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचं धक्कादायक प्रकरणही समोर आलं. या दोन्ही प्रकरणांचा सध्या तपास सुरु असतानाच पुन्हा एका नव्या हत्याकांडाने मुंबई हादरून गेली आहे. या नव्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने आपल्याच शेजाऱ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह त्याच्याच घरात लपवल्याचं समोर आलं आहे. मुंबईमधील एका डिलिव्हरी बॉयने शेजाऱ्यांबरोबर झालेल्या किरकोळ वादातून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शेजाऱ्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून त्याच्याच घरात लपवण्याचा खळबळजनक खुलासाही त्याने केला आहे.

कसा झाला खुलासा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी शाहू नगर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहत असलेल्या या डिलिव्हरी बॉयचं नाव जेम्स पॉल कानारन असं आहे. या तरुणाला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या हत्याकांडासंदर्भात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली. रविवारी मयत व्यक्तीच्या घरी मासिक मेन्टेन्स घेण्यासाठी इमारतीमधील काही व्यक्ती गेल्या होत्या. यावेळी त्यांना मयत व्यक्तीच्या घरातून दुर्गंध येत असल्याचं जाणवलं. त्यांनी तातडीने यासंदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घराचा दरवाजा तोडला असता समोरचं दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला. समोर घरमालकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. हा मृतदेह चादरीने झाकण्याचा प्रयत्न केला होता.

नेमकं घडलं काय?

पोलिसांच्या तपासामध्ये मयत व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या डिलिव्हरी बॉयने या व्यक्तीला शुक्रवारी रात्री दारु पिण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दारु प्यायल्यानंतर रागात बाचाबाची सुरु झाली आणि त्यामधूनच या डिलिव्हरी बॉयने शेजाऱ्यावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी 2 दिवसांपासून फरार होता. इमारतीमधील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. ही हत्या करण्यामागे अन्य काही हेतू आहे का याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. ही हत्या करण्यासाठी या तरुणाला इतर कोणी मदत केली का? हत्या करण्याआधी झालेल्या बाचाबाचीमध्ये नेमकं दोघांमध्ये काय बोलणं झालं, अचानक या दोघांमधील वाद एवढा विकोपाला का गेला यासारख्या प्रश्नांच्या माध्यमातून या गुन्ह्याची उकल होईल असं सांगितलं जात आहे.