अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असतानाच आता नागपूर पोलिसांच्या संवदेनशिलताही संपली आहे का? सवाल विचारला जात आहे. नागपुरात गेल्या महिन्याभराच्या कालावधीत घडलेल्या दोन घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त होत आहे.
जुलै महिन्यात मनोज ठवकर या दिव्यांगाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिनाही होत नाही तोच नागपुरात हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सोमवारी महेश राऊत नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी जबर मारहाण केली. 100 नंबरला फोन केला म्हणून पोलिसांनी महेश यांना मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी मारहाण झाल्याने अपमानित झालेल्या महेश राऊत यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या क्वार्टर परिसरात राहणारे महेश राऊत एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत होते. काल महेश राऊत यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मनोरुग्ण मुलाला काही जणांनी मारहाण केली. याची माहिती महेश यांनी तात्काळ 100 नंबरवर कॉल करुन पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले, आणि महेश यांना फोन केला. पण फोन घरी राहिल्यानं महेश यांना फोन उचलता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी महेशन यांनी खोटी माहिती दिल्याचा समज करुन घेतला.
संतापलेल्या पोलिसांनी महेश राऊत यांना घटनास्थळी बोलावून फोन का उचलला नाही याचा जाब विचारत थप्पड लगावल्या. परिसरात सर्वांसमोर मारहाण झाल्याचा प्रकार सुशिक्षित असलेले महेश राऊत यांच्या जिव्हारी लागला, आणि नैराश्यातून त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. अपमानित झाल्यानेच महेशने आत्महत्या केल्याचं त्यांचे भाऊ शैलेश राऊत यांनी म्हटलं आहे.
तर महेश राऊत यांनी फेक कॉल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. परिसरात मनोरुग्णाला मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नव्हती असा दावा पोलिसांनी केला आहे. तसंच फेक कॉल करणाऱ्या महेश यांना केवळ समज देऊन परतल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे.
महेशच्या मृत्यूने परिसरात संतापाचं वातावरण आहे. पोलीस यंत्रणेला गुन्ह्याची, गैरप्रकाराची माहिती देणं चूक आहे का असा प्रश्न विचारला जात आहेत
याआधी 7 जुलैला नागपूरच्या पारडी परिसरात मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीला मास्क आणि हेल्मेट घातलं नाही, या कारणासाठी नाकाबंदी लावलेल्या पोलिसांनी जबर मारहाण केली होती. त्यात मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे.