'झी २४ तास'कडून 'आनंदवारी'मधून एक विशेष उपक्रम

 'स्वच्छतेचा ध्यास, झी २४ तास' या संकल्पनेद्वारे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील प्रत्येकी चार अशा एकुण 8 सर्वोत्कृष्ट दिंड्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

Updated: Jun 16, 2017, 04:57 PM IST
'झी २४ तास'कडून 'आनंदवारी'मधून एक विशेष उपक्रम title=

देहू : झी २४ तास यंदा 'आनंदवारी'मधून वारक-यांच्या मेळ्याला एक विशेष उपक्रमाची जो़ड देत आहे. 'स्वच्छतेचा ध्यास, झी २४ तास' या संकल्पनेद्वारे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील प्रत्येकी चार अशा एकुण 8 सर्वोत्कृष्ट दिंड्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

जी दिंडी पंढरपुरपर्यंतच्या प्रवासात सातत्यानं स्वच्छता ठेवेल, तसंच स्वयंशिस्त आणि पर्यावरणविषयक उल्लेखनीय काम करेल अशा दिंड्यांचा झी २४ तासच्या वतीने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीच्या विशेष गौरव करण्यात येईल. या दिंड्यांचं परीक्षण करण्यासाठी चार विशेष परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त अभय टिळक यांच्यासह राजाभाऊ चोपदार, चंदाताई तिवाडी आणि सूर्यकांत भिसे हे परीक्षक म्हणून असतील. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहू संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे आणि सोहळा प्रमुख अभिजीत मोरे हे परीक्षक आहेत. 

तसंच वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावाला आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेणार आहोत. ज्या गावात स्वच्छतेविषयी जनजागृती दिसेल त्या गावाचा किंवा गावातील शाळेचा झी २४ तासच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे.