रायगड : एखाद्या वीकेण्डला तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा बेत आखत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करायचा विचार असेल, तर जरा सावधच राहा. कारण पॅरासेलिंगसंदर्भात नवे नियम करण्यात आले आहेत.
२५ मे २०१९ रोजी रायगडमधल्या मुरुड किनाऱ्यावर पॅरासेंलिंग करताना अपघात होऊन १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पॅरासेलिंगसाठी उड्डाण करताच जीपला बांधलेला दोरखंड अचानक निखळला. त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला.
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, नागाव, काशिद, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांवर जेट स्की, स्पीड बोट, बनाना राईड, सोफा राईडसह पॅरासेलिंगही केलं जातं. पण जीपला बांधून करण्यात येणाऱ्या पॅरासेलिंगला परवानगी नाही. तरीही सर्रास अशा प्रकारे पॅरासेलिंग केलं जातं.
पॅरासेलिंग हा साहसी खेळातील एक प्रकार राज्यामध्ये अवैध असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. विधानपरिषदमध्ये लक्षवेधी प्रश्नाच्या माध्ययमातून मुरुड येथे पॅरासेलिंग करतांना तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण उपस्थित करण्यात आल होतं. अशा साहसी खेळामध्ये झालेल्या मृत्यूला जबावदार कोण असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. हे खेळ कोकणाच्या किनाऱ्यावर सर्रास सुरु असतांना याला रोखणार कोण, अशा खेळांवर नियंत्रण कोणाचे, या खेळातील सुरक्षेच्या धोरणाचे काय असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले.
तेव्हा राज्य शासनाने क्रीडा धोऱण जाहीर केल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांनी दिली. त्यानुसार क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. यामध्ये पॅरासेलिंग या खेळाचा समावेश नसून या पॅरासेलिंग साहसी खेळाला परवानगी नाही, हा साहसी क्रीडा प्रकार अवैध असल्याचं राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मात्र जर पॅरासेलिंग हा साहसी क्रीडा अवैध असेल तर मग याचे आयोजन कोकण किनाऱ्यावर सर्रास केले जाते त्याचे काय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यावर मात्र पर्यंटन राज्यमंत्री सारवासारव करताना दिसले.
पर्यटकांनो, तुमच्या सुरक्षेची काळजी तुम्हीच घ्या. नियमबाह्य पॅरासेलिंग करुन जीवाशी खेळ करु नका.