पालघर साधु हत्याकांड: सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

पालघर साधू हत्याकांडात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

Updated: Jul 27, 2020, 04:32 PM IST
पालघर साधु हत्याकांड: सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या घटनेत दोन साधूंसह तीन जण ठार झाले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारा दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय / एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 16-17 एप्रिलच्या रात्री दोन साधू आपल्या ड्रायव्हरसह गावातून जात होते तेव्हा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता.

संतप्त जमावाने त्यांना मारहाण केली, त्यादरम्यान पोलीस तिथे उपस्थित होते. पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करून अनेक पोलिसांना निलंबित केले. आता या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्व याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी ऐवजी न्यायालय याचिकांवर एकाच वेळी सुनावणी घेणार आहे.