सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आहे, तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मानाच्या आणि मोठ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेली असल्यामुळं अनेक भाविक पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसत आहेत. इथं भाविकांची झालेली गर्दी पाहता एका मोठ्या संकटानं नुकतीच देवाच्या दारी चाहूल दिली आणि अनेकांनाच धडकी भरली. (Ashadhi ekadashi 2024 )
बुधवारी पहाटेपासूनच विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी मोठ्या भाविक दर्शन रांगेमध्ये उभे होते. सकाळच्या सुमारास या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गर्दी झाली आणि पुढे काही कळायच्या आतच रांगेच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
मंदिर समितीचे एकही सुरक्षा रक्षक रांग लावण्यासाठी किंवा ती नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गर्दीच्या या वातावरणात भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे मंदिर समिती नव्या नव्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे या प्रसंगामुळं समोर आलं आणि मंदिर प्रशासनाला ख़डबडून जाग आली.