'आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका'; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन भरवलं जाईल अशी घोषणा केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 1, 2023, 07:03 AM IST
'आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका'; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला title=
आव्हाड यांनी 'एक्स'वरुन केलेल्या पोस्टमधून केली टीका

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 'एक देश, एक निवडणूक', समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अधिवेशनासंदर्भात चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलं

3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलेले असतानाच ऐन गणेशोत्सवाच्या काळात बोलवण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून नवीन संसदभवनामधून कामकाज सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे. तर अन्य एका चर्चेनुसार जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन केलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिवाळी अधिवेशन नव्या संसदभवनामध्ये होणार हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या विशेष अधिवेशनाच्या कालावधीवर आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

आव्हाड यांनी साधला निशाणा

आव्हाड यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास 'एक्स'वरुन (ट्विटवरुन) केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. "महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि त्याच वेळेला नेमकं लोकसभेचे अधिवेशन लागले आहे," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आव्हाड यांनी, "आता सण-उत्सवसुद्धा साजरे करायचे नाहीत अशी भूमिकाच दिसतेय हिंदुत्ववादी पक्षांची. आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका म्हणजे नशीब," असा टोला आव्हाड यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता लगावला आहे.

विरोधकांना धक्का देण्याच्या तयारीत सरकार?

'अमृतकाळात होणाऱ्या या विशेष अधिवेशनामध्ये फलदायी चर्चेची अपेक्षा आहे,' असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र सरकारकडून या अधिवेशनासंदर्भातील सविस्तर तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. गुरुवारी मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीचा पहिला दिवस असतानाच सायंकाळच्या सुमारास या विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्याने या अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत सरकार आहे की काय अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ संपवण्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.