विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : कोरोना काळात सगळ्याच दुकानांमधली विक्री घटलीय. मात्र बाजारातल्या एका दुकानात मात्र बरीच गर्दी होतेय. कुठलं आहे हे दुकान आणि तिथे का होतेय गर्दी.राज्यात कोरोना वाढत असताना आणि बाजारही ओस पडत असताना एका दुकानात मात्र मोठी गर्दी आहे. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवावी म्हणून लोक विटामिनच्या गोळ्या घेतायत. त्याचबरोबर अंड्यांवरही ताव मारला जातोय. अंड्यांमध्ये प्रथिनं असतात आणि तीच प्रथिनं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
कोरोना वाढल्यापासून अंड्यांना बाजारात मोठी मागणी वाढलीय. औरंगाबाद शहरात दिवसाला 8 ते १० लाख अंडी खपतायत, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अंड्यावर ताव मारला जात आहे. ज्यांना कोरोना झाला आहे अशा लोकांनीही अंड्यांवर ताव मारणे सुरु केलं आहे.
अंड्यात मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वं आणि खनिजं आहेत, तसंच अंड्यामध्ये अमिनो आम्ल असतं, अंड्यात ए, बी, बी 12, डी आणि ई जीवनसत्व आहेत, रोज एक किंवा दोन अंडी शरीरासाठी फायदेशीर आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फळांची विक्री सुद्धा वाढलीय. पण फळांच्या तुलनेत अंड्याची किंमत कमी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं ही सध्या काळाजी गरज आहे. अशा वेळी नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं केव्हाही चांगलं. म्हणूनच अंडी खा, रोगप्रतिकारकशक्ती वाढवा असं म्हणतात.