औरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध

शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

Updated: May 13, 2018, 01:56 PM IST
औरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध title=

औरंगाबाद : अचानक उफाळलेल्या औरंगाबादच्या हिंसाचारात काही पोलीस जखमी झालेत. यात शहर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांचाही समावेश आहे. शनिवारपासून कोळेकर हे बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांच्या गळा आणि स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि राजश्री आढेही जखमी झालेत. कदम यांच्या गालावर दगड पडल्याने ते जखमी झाले. तर, राजश्री यांचा पाय फ्रॅक्चर झालाय.  

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

दरम्यान, शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. अफवा पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. अजूनही ही सेवा खंडित आहे.

विरोधकांची मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

पोलिसांनी औरंगाबाद शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, आता या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवली असून, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची तसेच, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सरकारवर टीकेची तोफ डागताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी औरंगाबाद हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप केलाय. तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केलीय. ते लातूरमध्ये बोलत होते. गृहखात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.