अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट घेऊन त्यानं केलेल्या सत्काराचा स्वीकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती त्यावेळी या भेटीवरून चर्चांना उधाण येत अजित पवार गटावर सडकून टीका झाली होती. किंबहुना ती भेट म्हणजे, चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होत. तेव्हा आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळे त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागणार असंच दिसत आहे. (Nilesh Lanke Meets Gaja Marne )
गजा मारणेचे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध लपून राहिलेले नाहीत. याआधीदेखील अनेकदा नेतेमंडळींशी त्याची भेट चर्चेचा विषय ठरली होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंके यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, जिथं मारणेनं लंकेंचा शाल श्रीफळ देत सत्कार केला आणि हा सत्कार स्वीकारणारे नवनिर्वाचित खासदार मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
गजा मारणेची एकंदर कारकिर्द पाहिली असता त्याच्या नावे अनेक गुन्हे दाखल असून, खुनापासून खंडणी आणि तत्सम इतर गुन्ह्यांचीही त्यांच्या नावे नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गुंडांची परेड घेतली होती तिथंही गजा मारणेला बोलवण्यात आलं होतं. एकिकडे पोलिसांकडून गजा मारणेला नियंत्रणात ठेवलं जात असताना नेतेमंडळी त्याच्या घरी जातात आणि त्याची भेट घेतात ज्यामुळं जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचं म्हटलं जात आहे.
गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणेचा जन्म मुळशी तालुक्यात झाल्याचं सांगितलं जातं. शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर त्यानं गुन्हेगारी क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. पुणे शहर आणि कोथरुड इथं त्याच्या टोळीची दहशत पाहायला मिळते. मारणेनं तीन वर्षांची कारावासाची शिक्षाही भोगली आहे. दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून मारणेचं नाव अनेक नेतेमंडळींशी जोडलं गेल्यामुळं राजकीय वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा वारंवार पाहायला मिळाली.