आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.  

Updated: Aug 11, 2020, 08:59 AM IST
आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच  प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीन केले.  बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आणि निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्ष सुनीता शिंदे, बुलडाणा कृ.उ.बा.स. सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, मो. सज्जाद आदी उपस्थित होते.

 बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगाव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात सांगितली. तसेच याकामी टाटा समूहाने केलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून तेही लवकरच पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली.  या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे १०० आणि २० खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करुन दोन्ही रूग्णालयात उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, असे मुख्यमंत्री म्हणालेत. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समूहाला ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. केवळ अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्यावा. कोविडवरील उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, प्राणरक्षक औषधे यासारख्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सला असणाऱ्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी ते विनाविलंब मुंबई स्थित टास्क फोर्ससी संपर्क साधून मदत मिळवू शकतात, असेही  ठाकरे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, टाटा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत रूग्णालय जिल्ह्यात सुरू होत असल्याबाबत आनंद आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक पदांची भरती अधिक गतिमानतेने पूर्ण करून सर्व रिक्त पदे भरण्यात येतील. यावेळी टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. श्रीनाथ यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार प्रतापराव जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या मागणीचा पुनरूच्चार केला.