Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारीचं (Pune Crime) प्रमाण गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. पुण्यात कोयता गँगची दहशत पहायला मिळतीये. तर गँग वॉर पुन्हा उफळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडलाय. ललित पाटील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाईचा वेग वाढवला अन् ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागातून 80 किलोहून अधिक एमडीड्रग्स जप्त केले आहेत. आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाबाबत मोठी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आणखी एक मोठा साठा विश्रांतवाडीमध्ये जप्त केलाय. एका ट्रकमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्यासाठीचा तब्बल 340 किलो कच्चा माल सापडला, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तर जप्त केलेल्या 80 किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 1800 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. 9 आरोपींना अटक करण्यात आलीय, तर 8 फरार आरोपींचा कसून तपास सुरू आहे. ड्रग्जच्या विदेशी कनेक्शनचाही पोलीस तपास करतायत. त्यामुळे आता सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जातोय. ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना एका आरोपीला कोलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची आणि यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होतं. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा याला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचं नाव समोर आलंय. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.