अलिबाग : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. मात्र, आजही कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रायगड (Raigad ) जिल्ह्यातील कर्जत येथील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चव्हाण (Dr. Nitin Chavan) यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.
डॉ. नितीन चव्हाण यांना मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात सुरु उपचार होते. डॉ. चव्हाण यांनी 13 फेब्रुवारी रोजी कोरोना लसचा पहिला डोस घेतला होता. डॉ. चव्हाण यांना मधुमेह , उच्च रक्तदाब , किडनी विकाराचा त्रास होता. 21 मार्च रोजी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चव्हाण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, डॉ. चव्हाण यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशा शब्दात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच सर्वांनीच सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःची, स्वतःच्या कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबियांचीही काळजी घ्यावी, शासन-प्रशासन वारंवार देत असलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जनतेला केले आहे.