ललैश बारगजे, झी २४ तास, अहमदनगर : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील किन्ही येथील गोमा यशवंत खोडदे या ७८ वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर नातेवाईक न आल्याने सोमवारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाच्या वतीने वृद्धावर अंत्यसंस्कार केले. 15 एप्रिल रोजी गोमा यशवंत खोडदे यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यांना तालुक्यातील कर्जुले हर्या येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल. मात्र त्यांची प्रकृती खालावली.
शनिवारी तेथील डॉक्टरांनी खोडदे यांचा मुलांशी संपर्क करून वडीलांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना केली होती. परंतू एक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने येऊ शकला नाही तर दुसरा देखील आला नाही अखेर 19 एप्रिल ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोमा खोडदे यांचे रुग्णालयात निधन झाले.
रुग्णालय प्रशासनाने मुलगा रमेश यांना संपर्क साधून गोमा खोडदे यांचे निधन झाल्याचे कळविले. मात्र दुसऱ्या दिवशी येतो असे सांगितल्याने रुग्णालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांना संपर्क करून त्यासंदर्भात माहीती दिली. देवरे यांनी तो मृतदेह पारनेर येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या.
रमेश खोडदे यांच्याशी संपर्क केला त्यांनी तात्काळ येणे शक्य नसल्याचे सांगितले. एक भाऊ रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे गावातील लोकही अंत्यविधिस येऊ शकत नसल्याने व मुलानेही असमर्थता दर्शविल्याने अखेर प्रशासनानेच अंत्यविधी करण्याच निर्णय घेतला.
पारनेर नगरपंचायत हद्दीतील अमरधाममध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार ज्योती देवरे यांनी गोमा खोडदे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.