Supriya Sule Post: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, "अत्यंत महत्वाचे" असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली आहे. "माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक केलं आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. मात्र सुप्रिया यांच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आल्याने आणि थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्याने यामागील व्यक्तींच्या नावासंदर्भात लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांचे डिजीटल डिव्हाइज हॅक करण्याचा त्यावरील माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रोजनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचे आरोप अनेकदा झाले आहेत.
जुलै महिन्यामध्येच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘एक्स’वरुन, मोदी सरकार त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचा मोबाइल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप केले होते. 13 जुलै रोजी केलेल्या पोस्टमध्ये वेणुगोपाल यांनी मला माझ्या आयफोनवर ॲपल कंपनीकडून यासंदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठीचा मेल आला आहे, असं म्हटलं होतं. वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटमध्ये मेलवरुन करण्यात आलेल्या सूचनेचे स्क्रीनशॉट जोडले होते. “तुम्हाला स्पायवेअर हल्ल्याद्वारे लक्ष्य केले जात असून हा हल्ला तुमच्या ॲपल आयडीशी लिंक केलेल्या आयफोनवर केला जात आहे. आज अशी सूचना 98 देशांमधील युझर्सला पाठवली जात आहे. आतापर्यंत ॲपलने 150 हून अधिक देशांमधील युझर्सला यासंदर्भात सावध केले आहे,” असं या स्क्रीनशॉटमधील मजकुरामध्ये म्हटलं आहे. ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये हे काम ‘भाडोत्री स्पायवेअर’च्या (Mercenary Spyware) माध्यमातून झाल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पेगाससचा (Pegasus) देखील उल्लेख करण्यात आला आहे.
मागील अनेक महिन्यांपूर्वी एनएसओ या इस्रायली कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर भारतात बरेच चर्चेत आहे. भारतात या स्पायवेअरचा वापर करून केंद्र सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला होता. यावरून देशातील राजकीय वातावरण बरेच तापले होते.