सचिन कसबे, झी मीडिया
Shri Vitthal Rukimini Mandir: पंढरपुरला जाण्याचा बेत आखताय का? तर ही बातमी तुमच्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पद स्पर्श दर्शन तब्बल दीड महिना दर्शनासाठी बंद असणार आहे. जतन संवर्धन कामामुळे बंद ठेवण्याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळं भाविकांना आता दर्शन कसे व कोणत्या वेळेत घेता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
आषाढी एकादशी पूर्वी एक महिना श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील जतन संवर्धन काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. देवाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचे काम १५ मार्च पासून सुरू होणार आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी पद स्पर्श दर्शन जवळपास दीड महिना बंद राहणार आहे. याकाळात फक्त पहाटे 5 ते 10.45 याकाळात भाविकांना मुख दर्शन करता येणार आहे. याकाळात देवाचे जे सध्या नित्योपचार सुरू आहेत. ते काम सुरू असताना पूर्वी प्रमाणे सुरू असणारं आहेत.
दीड महिना दर्शन बंद काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती बुलेट प्रुफ काचेत बंदिस्त केली जाईल. ज्यामुळे काम करताना धुळीचे कण, काम करतानाची स्पंदने मूर्ती पर्यंत जाणार नाहीत. या काचेत कॅमेरा बसून येथील सर्व चित्रीकरण भाविकांना पाहता येईल याची व्यवस्था केली जाणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढले जाईल. सिमेंट डाग काढले जातील. दगडांना मूळ रूप दिले जाईल. गाभाऱ्यातील खालची फरशी काढली जाईल. चुन्याने दर्जा भरणे, केमिकल कोटिंग भिंतीना केले जाईल. गर्भ गृहातून चौखांबी कडे काम केले जाईल. ५ जून पर्यंत सर्व काम करुन सर्व मंदिर पुरातत्व विभाग जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीच्या ताब्यात देईल असे नियोजन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे