मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... देवदर्शन करुन परतणारे 11 प्रवासी जखमी

Bus Accident :  पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन (Pune-Solapur National Highway) पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दौंड आणि भिगवन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Updated: Apr 8, 2023, 01:17 PM IST
मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... देवदर्शन करुन परतणारे 11 प्रवासी जखमी title=

जावेद मुलानी, झी मीडिया, सोलापूर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) मळद येथे एका खासगी बसला झालेल्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले आहेत. देवदर्शन करुन भाविकांनी घेऊन जाणारी बस पहाटेच्या सुमारास पलटली आणि हा भीषण (Bus Accident) अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे या बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती पलटली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी (Daund Police) घटनस्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरु केला. तर बसमधील सर्व प्रवासी हे पुण्यातील रहिवासी असून ते देवदर्शन करुन घरी परतत होते. त्याचवेळी मद्यधुंद बसचालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी आनंद ट्रॅव्हल्स कंपनीची बस 50 प्रवाशांना घेऊन देवदर्शनासाठी निघाली होती. कोल्हापूर, तुळजापूर, येडाई, अक्कलकोट येथून देवदर्शन करून पुण्याकडे परतत असताना हा अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बसचालकाचा ताबा सुटल्याने बस पलटली आणि गंभीर अपघात झाला. पहाटेची वेळ असतानाही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवासांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. गंभीर व काही किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना दौंड आणि भिगवण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ट्रॅव्हल्स चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पुण्याकडे जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला 15 फूट खोल नाल्यात पलटली. सकाळी सहा वाजणाच्या सुमारास अंधार असल्याने बसमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता. खोल नाल्यात गाडी पलटी झाल्याने समोरील व क्लिनर बाजूकडील अनेक प्रवाशांना मोठ्या जखमा झाल्या. मळद परिसरातील तरुणांनी मोठ्या शर्तीने जखमींना बाहेर काढत मदत केली. जखमींमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष व लहान मुले-मुली होती. 

घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली.  सुमित जोगदंड, ज्योती वंजारी, सिद्धार्थ पवार, लक्ष्मी पवार, वैभवी परदेशी, बनेवाल लोंढे, आरती कांबळे, पोर्णिमा पवार, संगीता मोरे सुनंदा मोरे, सोहम पवार या प्रवाशांवर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.