मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दीपक साळुंखे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सांगोला विधानसभा जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यानं साळुंखे शिवसेनेत जातील अशीही चर्चा आहे.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होणार आहेत. अवधूत तटकरे, भास्कर जाधव, गणेश नाईक यांच्यानंतर आणखी काही नेते राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.