कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते आणि दानोळी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरना लक्ष करत ट्रॅक्टर पेटवून दिले आहेत. इतकंच नाही तर तीनहून अधिक ट्रॅक्टरची मोडतोड केली आहे. २३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद आहे. या ऊस परिषदेमध्ये उसाचा दर किती मिळाला पाहिजे याबाबत भूमिका जाहीर केली जाते.
जो पर्यंत ऊस परिषदेमध्ये ऊस दराची भूमिका जाहीर केली जात नाही. तोपर्यंत उसाची तोड घेऊ नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असते. कोणी उसाचा दर जाहीर न करताच उसाची तोड घेतली तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रकला लक्ष करतात. यंदाच्या हंगामात उसाचं कमी झालेले क्षेत्र आणि महापुरामुळे उसाचा झालेलं नुकसान यामुळे साखर कारखानदार उसाची पळवापळवी सुरू केली आहे.
इतकंच नाही तर शेजारील कर्नाटक राज्यातील साखर कारखाने महाराष्ट्रातला उस पळवत असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ला लक्ष करत हे ट्रॅक्टर पेटवून दिलेत.
दरम्यान आज शिवसेनेची देखील कोल्हापूर जिल्ह्यातील तुरंबे इथं ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या ऊस परिषदेत नेमकी काय मागणी केली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचा आहे. एकूणच काय ऊसदरावरून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये ऊसदरावरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता दिसून येत आहे.