महाराष्ट्रात घातपाताचा कट? रायगड समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट, विधानसभेतही मुद्दा उपस्थित

रायगड समुद्रकिनाऱ्याजवळ सापडलेल्या बोटीत AK-47 आढळल्याने खळबळ

Updated: Aug 18, 2022, 03:06 PM IST
महाराष्ट्रात घातपाताचा कट? रायगड समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट, विधानसभेतही मुद्दा उपस्थित title=

Raigad Suspicious Boat : रायगड जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यात संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली असून बोटीत एका पेटीत 3 AK-47 आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर (Harihareshwar Beach) सापडलेल्या संशयास्पद बोटीत 3 AK-47 रायफली आणि काही काडतूसं सापडली आहेत. रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 

विधानसभेत मुद्दा उपस्थित
रायगड जिल्ह्यात सापडलेल्या संशयास्पद बोटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विधानसभा तालिका अध्यक्षांनी याप्रकरणी सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत. 

स्पेशल टीम स्थापन करण्याची मागणी
दरम्यान, या घटनेची राज्य सरकारच्या तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी आदिती तटकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल टीम स्थापन करुन तपास करावा अशी मागणीही आदिती तटकरे यांनी केली आहे. यात केंद्राच्या एजन्सीची गरज लागली तर राज्य सरकारने संपर्क करावा, अशी मागणी आदिती तटकरे यांनी केली आहे. 

दहिहंडी आणि गणेशोत्सवाच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर रायगडमध्ये चाकरमणी येतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता, राज्यसरकारच्यावतीने तातडीची उपाययोजना करण्यात यावी असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. 

अतिशय गंभीर घटना - अशोक चव्हाण
देशावर अशाप्रकारचा हल्ला करण्याचा नियोजित कट असावा अशी शंका आहे, आम्ही सरकारच्याबरोबर आहोत, पोलीस यंत्रणांना तातडीने सखोल तपास करावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.