सात नद्यांचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच, धार्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!

Shri Panchganga Mandir: महाराष्ट्राला धार्मिक महत्त्वही लाभले आहे. राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांना भेटी देण्यासाठी भाविक गर्दी करतात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 8, 2024, 06:31 PM IST
सात नद्यांचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच, धार्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!  title=
Shri Panchganga Mandir history, Panch Ganga Temple Mahabaleswar,Shri Panchganga Mandir route, Shri Panchganga Mandir how to go

Shri Panchganga Mandir: महाराष्ट्र हा विविधतेने नटलेले प्रदेश आहे. कोकणातील समुद्र, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य पाहायला देश-विदेशातून लोक महाराष्ट्रात येतात. निसर्गसौंदर्याबरोबरच राज्यात तीर्थस्थळही आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत राज्यात अनेक पर्यटक येतात. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर यासारखी थंड हवेचे ठिकाणं आहेत. यातीलच एक महाबळेश्वरला निसर्गाबरोबरच धार्मिक परंपराही लाभली आहे. महाबळेश्वर हिलस्टेशन असले तरी अनेक इथे अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. तसंच, येथील पंचगंगा मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. एकाच ठिकाणी सात नद्यांचा उगम झालेले जगातील हे पहिलेच ठिकाण असावे. 

महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो म्हणूनच या पंच नद्यांच्या संगमाला पंचगंगा असं नाव दिलं आहे. पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी. या सर्व नद्या दगडांच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या मुखातून बाहेरील कुंडात पडतात. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे, या पाच नद्यांच्या व्यतिरिक्त सरस्वती आणि भागीरथी या दोन नद्यांचाही संगम होतो. मात्र, एका विशिष्ट वेळी. 

पंचगंगा मंदिरात पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ बाराही महिने वाहत असतो. मात्र, सरस्वती नदीचा ओहोळ 60 वर्षांनी वाहतो. आता थेट 34 वर्षांनी सरस्वती नदीचे दर्शन होणार आहे. तर, भागीरथी नदीचा ओहोळ प्रत्येक 12 वर्षांनी दर्शन देतो. आता 2016 मध्ये श्रावण महिन्यात नदीचे दर्शन होणार आहे. हे चमत्कारित मंदिर पाहण्यासाठी आणि नद्यांचे दर्शन घेण्यासाठी दुरवरुन लोक येतात. 

पंचगंगा मंदिराला ऐतिहासिक वारला लाभला आहे. पंचगंगा मंदिर साधारण 600 वर्षांपूर्वी बांधले असल्याची नोंद समोर येते. यामंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम या मंदिरातून झाला असल्याचे पुराणात आढळते. तर, धार्मिक मान्यतेनुसार, दर बारा वर्षांनी उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटायला म्हणून येते. तर, साठ वर्षांनी सरस्वती नदी गायत्रीस भेटायला येते. या पाच नद्यांच्या प्रवाहाबरोबर या नद्यांही काही काळासाठी प्रवाहित होतात. या नद्यांचे पाणी गोमुखातून एका कुंडात सोडले जाते. त्यास ब्रह्मकुंड असंही म्हणतात. तर, त्याच्या शेजारी विष्णुकुंडदेखील आहे. या विष्णुकुंडात सात बहिणी गुप्त होऊन श्रीमहाबळेश्वर मंदिरात एकत्र येतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)