एसटीकडून निवृत्तीनाथांच्या पालखीचं 'तिकीट', परिवहन मंत्र्यांकडून खेद

एसटी महामंडळाने निवृत्तीनाथांच्या पालखीचं ७१ हजार रुपयांचं तिकीट आकारल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Updated: Jul 1, 2020, 06:59 PM IST
एसटीकडून निवृत्तीनाथांच्या पालखीचं 'तिकीट', परिवहन मंत्र्यांकडून खेद title=

मुंबई : एसटी महामंडळाने निवृत्तीनाथांच्या पालखीचं ७१ हजार रुपयांचं तिकीट आकारल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी खेद व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही अनिल परब यांनी दिले आहेत. 

'निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नाशिकमधून एसटी बससाठी गैरसमजातून वारकऱ्यांसाठी पैसे घेतले गेले आहेत. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. या सगळ्या वारकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. या सर्व प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात संबंधित दोषींवर कारवाई करणार आहे,' असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या संकटात यंदाच्या वर्षी वारीची परंपरा रद्द करत संतांच्या पालख्या एसटीने पंढरपूरला नेण्यात आल्या. संतांच्या या पालख्यांसोबत ठराविक वारकऱ्यांना पंढरपूरला जायची परवानगी देण्यात आली. पण नाशिकमधून निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांकडून ७१ हजार रुपये महामंडळाने घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं.

दुसरीकडे भाजपने या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. 'सरकारने संतांच्या पादुका हेलिकॉप्टरमधून नेण्याचा शब्द पाळला नाही आणि बसभाडे आकारून संतांच्याच भूमीत संताचा अपमान केला,' असं ट्विट महाराष्ट्र भाजपने केलं आहे.