अरूण मेहेत्रे / शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे ध्येय घेऊन श्रमदान करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आला होता. यावेळी आमिर खानचा साधेपणा पाहायला मिळाला. औसा तालुक्यातील फत्तेपुर इथं श्रमदान करणाऱ्यांसाठी ग्रामस्थांनी वरण-भात आणि बुंदीचे लाडूची न्याहरी बनवली होती. श्रमदान संपल्यानंतर पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आमिर गाडीत बसला होता. मात्र ग्रामस्थांनी न्याहरीचा आग्रह केला. त्यावेळी आमिरने जास्त आढेवेढे न घेता गावकऱ्यांसह वरण-भात आणि बुंदीच्या लाडूचा आस्वाद घेतला.
श्रमदानाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शामियानात आमीरने टेबल-खुर्चीवर बसून ग्रामस्थांसोबत जेवण घेतले. इतका मोठा कलाकार आपल्यासोबत बसून वरण भाताचे जेवण घेत असल्यामुळे ग्रामस्थ कमालीचे खूश झाले होते.
आज महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या गावोगावी एका शुभकार्याचा श्रीगणेशा झाला. आमिर खानच्या पाणी फाऊण्डेशनच्या माध्यमातून गावोगावी कुदळ आणि फावडं घेत मराठमोळे गडी कामाला लागले. महाराष्ट्रदिनी श्रमदानाचं तूफान आलं. १ मे महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत पाणी फाऊण्डेशनचा सर्वेसर्वा आमिर खान लातूरमधल्या औसा तालुक्यातल्या फत्तेपूर गावात पोहोचला..... आमिरबरोबर आलिया भटनंही कुदळ फावडं हाती घेतलं आणि श्रमदानाला सुरुवात झाली.... आमिर, आलियासह ग्रामस्थांनी निर्धार केला फत्तेपूरला पाणीदार करण्याचा... आमिर आणि आलियाच्या सहभागामुळे ग्रामस्थांचाही उत्साह वाढला होता.
पुण्यात श्रमदानासाठी सई ताम्हनकर पोहोचली... सईनं पुरंदरमध्ये श्रमदान केलं... ग्रामस्थांनीही कुदळ फावडं हाती घेतलं आणि पाणी अडवण्याच्या शुभकार्याचा श्रीगणेशा झाला.
पुढच्या काही दिवसांत गावागावांमध्ये श्रमदानाचा हा यज्ञ धगधगता राहणार आहे...... ही सुरुवात आहे भविष्यातल्या पाणीदार महाराष्ट्राची...