Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. मात्र गावात पाणी नसल्यामुळे मुलांचे लग्न थांबले आहे. तर 30 ते 35 कुटुंबाने चक्क गाव सोडून गेले. 1962 पासूनचा हा प्रश्न कोणत्याही सरकारने सोडला नाही. मुंबईत जाऊन मंत्रालयाच्या शेकडो चकरा मारल्या. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात पाणी नसल्याने मुलांचे लग्न होत नाही. या गावात मुली देण्यासाठी पालक देखील घाबरतात? बांबर्डा, बोरखेडी यासह आठ गावांना पाणी टंचाईचे भीषण वास्तव आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असलेल्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई या आठ गावांना एक वेगळेच ग्रहण लागलेले आहे. या ग्रहणामुळे येथील शाळकरी मुलांना खेळता येत नाही. लग्नाचे वय असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आणि सर्वात भयानक म्हणजे याच ग्रहणामुळे काही ग्रामस्थांनी आपले गाव सुद्धा सोडली आहे.
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात सध्या एक समस्या मोठी गंभीर बनली आहे. या गंभीरतेचे स्वरुप दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ही समस्या आहे पाण्याची.... या गावात शेतीसाठी, पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणीच मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक वैतागून गेले आहे. देश स्वतंत्र झाला पण आम्ही गावकरी अजूनही स्वतंत्र झालेलो नाही, अशी प्रतिक्रिया गावकरी देत आहेत. गेल्या 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई सुरुच असून सरकारला अजूनपर्यंत जाग येत नाही.
आष्टी तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई या गावात स्वतंत्र काळापासून पाण्याची समस्या भेसडावत आहे. गावातील शेती हे मान्सूनच्या भरवश्यावर आहे. गावात पाणी नसल्याने सकाळी 7 वाजल्यापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी नसल्यामुळे जनावरांना पाण्याची समस्या दरवर्षी भेडसावत असते. पाण्याच्या समस्येमुळे गावात 30 ते 35 कुटुंब आतापर्यंत गावं सोडून गेल्याचे माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
मे महिन्यात गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण होते. गावात पाणी नसल्याने आणि सकाळपासूनच गावातील महिला आणि मुलांना पाण्यासाठी शेतातील विहिरीवर जावं लागत आहे. तर उन्हाळ्यात शेतातील विहिरीतील गावाच्या 2 किमी अंतरावरुन बैलबंडी वरून ड्रम भरुन पाणी आणावे लागते. गावात पाणी नसल्याने या गावात लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नाहीत. त्यामुळे गावात लग्नाळू तरुणांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे गावात मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे आणि मजुरांना बहुतांश वेळा पाण्यासाठी व्यस्त राहावे लागत असल्याने त्यांची मजुरीही बुडत आहे.
वर्धा जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण न व्हावी म्हणून आराखडा तयार केला जातो. त्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जाते. मात्र पैसे खर्च करुनही जर गावाला पिण्यासाठी मिळत नसेल तर नेमकं पाणी मुरतेय कुठे असा सवाल उपस्थित झाला आहे.