जालना : राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातच महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पाण्याअभावी बबनराव लोणीकर यांना त्यांच्याच मतदार संघातील महिलांच्या रोषाला सामोर जावं लागलंय. नळाला पाणी येत नसल्यानं मंठा तालुक्यातील तुळजाभवानी नगरच्या महिलांनी रस्त्यावर येऊन लोणीकरांचा गाड्यांचा ताफा अडवला आणि ताफ्यातील गाड्यांसामोर हंडे नेऊन ठेवले.
लोणीकर हे विडोळी गावच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. मात्र लोणीकरांच्या ड्रायव्हरने गाडी बाजूने घेऊन महिलांच्या रोषातून लोणीकरांना सोडवलं. त्यामुळे महिलांना पाण्याचा प्रश्न पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर मांडता न आल्यानं महिला अधिकच संतापल्या. त्यामुळे भाजप सरकारविरोधात महिलांनी राग व्यक्त केलाय.
दरम्यान, अल्प पर्जन्यमानामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. या दुष्काळी स्थितीचा फटका नागरिकांबरोबरच वन्यप्राणी आणि पक्षांनाही बसतोय. पाण्याच्या शोधात २५ माकडं विहिरीमध्ये पडल्याची घटना नेर तालुक्यातल्या जवळगावात घडली. सुदैवानं वनविभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढलंय. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिक आंदोलन करत असले तरी मुक्या जीवांनी कुणाकडे पाणी मागावं अशी स्थिती आहे.
जवळगाव परिसरात पाण्याचा शोध घेत माकडं आली आणि विहिरींमध्ये पाणी पिण्यासाठी उतरले. त्यातील २५ माकडं ३ वेगवेगळ्या विहिरींमध्ये पडली. शेतमालकांना माकडांचा आवाज आल्यानं त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि नेर वनविभागाच्या पथकाला माहिती मिळताच बचाव कार्य करून विहिरीतील २५ माकडं बाहेर काढून त्यांची सुटका केली.