Explainer: अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण का वाढले?; सोप्या भाषेत समजून घ्या

Cyclone In Arabian Sea: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी त्याचा परिणाम मात्र जाणवत आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 12, 2023, 03:49 PM IST
Explainer: अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण का वाढले?; सोप्या भाषेत समजून घ्या title=
why Intensity of cyclones in Arabian Sea increased know the details

मुंबईः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र झाले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून हे चक्रीवादळ दूर असले तरी त्याचा परिणाम मुंबई व कोकण किनारपट्टीला जाणवत आहे. बिपरजॉय वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीच्या भागात समुदाला उधाण आलं आहे. वाऱ्याचा वेगदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अरबी समुद्रात यंदाच्या वर्षातील हे पहिले चक्रीवादळ आहे. गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळे तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र असे का होत आहे, याचे कारण जाणून घेऊया.

बिपरजॉय चक्रीवादळ

अरबी समुद्रात आता तयार झालेल्या चक्रीवादळाचे नाव बिपरजॉय असे ठेवण्यात आले आहे. बांग्लादेशने हे नाव दिलं आहे. बांग्लादेशमध्ये बिपरजॉय या शब्दाचा अर्थ विध्वंस असा होतो. अरबी समुद्रात मात्र वादळांची संख्या का वाढतेय हे जाणून घेऊया. 

अरबी समुद्रात चक्रीवादळं 

अरबी समुद्रात मान्सूनच्या आधी चक्रीवादळं निर्माण होण्याची तीव्रता ४० टक्क्यांनी वाढली आहे. तर, २० टक्के चक्रीवादळे मान्सूननंतर तयार झाली आहेत. मात्र यापूर्वी अरबी समुद्रात इतक्या तीव्रतेने चक्रीवादळे निर्माण होत नव्हती. त्याची तीव्रता आत्ताच वाढली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, समुद्रातील पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्यामुळं चक्रीवादळे निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे, १९८१- २०१०च्या तुलनेत गेल्या २०१९ साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ०. ३६ अंश सेल्सियसने वाढले आहे. 

कारणे काय?

हवामान बदलामुळं जगभरात चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. ताज्या अहवालानुसार, मार्चनंतर अरबी सागराचे तापमान १.२ अंशाने वाढली आहे. ही स्थिती चक्रीवादळे निर्माण होण्यासाठी पोषक असते. तसंच, या चक्रीवादळाची तीव्रताही वाढत जाते. 

मान्सूनवर होऊ शकतो परिणाम

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या संख्येत वाढ झाली तर मान्सूनवरही त्याचा परिणाम होतो. चक्रीवादळामुळं मान्सूनच्या आगमनावरही अनिश्चतेचे सावट आहे. मान्सून वेळेत न दाखल झाल्यास त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसंच, कृषी क्षेत्रावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. 

अरबी समुद्रात निर्माण झालेली वादळे

अरबी समुद्रात निर्माण झालेली वादळे मुंबईवर जरी थेट धडकली नसली तरी मुंबई आणि कोकणातील किनारपट्टीवर त्याचा परिणाम जाणवला. फयान, तौक्ते, निसर्ग ही चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती.