मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET घोटाळ्याप्रकरणी अनेक बडे मासे गळाला लागले आहेत. याप्रकरणी सौरभ त्रिपाठीला अटक झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली आहे. पैसे घेऊन बोगस उमेदवारांना कसं पास केलं जात होतं, नेमकं हे रॅकेट कसं काम करत होतं, हे आपण झी २४ तासच्या 'ऑपरेशन मुन्नाभाई गुरूजी' या स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत. (zee 24 taas invesigation on teacher eligibility test scam opertaion munnabhai guruji)
पुणे पोलिसांची धडक कामगिरी
पुणे पोलिसांनी TET घोटाळ्याप्रकरणी लखनौमधून सौरभ त्रिपाठी नावाच्या आणखी एका बड्या माशाला अटक केली. सौरभ त्रिपाठी हा 'विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड'चा प्रमुख आहे. सौरभच्या अटकेमुळं या प्रकरणातलं आणखी एक मोठं बिंग फुटलं.
यामुळे २०१८ आणि २०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षांमध्ये तब्बल एक दोन नव्हे तर ९०० बोगस शिक्षकांना पात्र ठरवण्यासाठी कोट्यवधींची देवाण घेवाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सौरभ त्रिपाठीनं यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांशी साटंलोटं जमवलं हे झी २४ तासच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झालं आहे.
सौरभ त्रिपाठीनं 2017 साली जी. ए. टेक्नॉलॉजीला परीक्षेचं कंत्राट मिळवून देण्यासाठी लायझनिंग केलं. 2018 आणि 2020 साली झालेल्या TET परीक्षांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली.
सौरभ आणि गँगनं पैसे घेऊन तब्बल 900 बोगस शिक्षकांना पात्र ठरवलं, अशी खळबळजनक माहिती झी २४ तासच्या हाती लागली. आता त्या 900 बोगस शिक्षकांचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. सौरभ त्रिपाठीच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील विविध परीक्षांची कंत्राटं मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतले वरिष्ठ अधिकारी, दलाल आणि खासगी कंपन्यांचे अधिकारी यांचं कसं साटंलोटं होतं? ते झी २४ तासनं शोधून काढलंय.
असा सुरू होता परीक्षा घोटाळा?
शिक्षण परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे तांत्रिक सल्लागार असलेल्या अभिषेक सावरीकरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांशी संपर्क साधायचा.
या कंपन्यांना कंत्राटं मिळवून देण्यासाठी सौरभ त्रिपाठी लायझनिंग करायचा. सौरभमुळंच जी. ए. टेक्नॉलॉजी सलग चार वर्षे TET परीक्षेचं कंत्राटं मिळालं.
आरोग्य भरती परीक्षेचं कंत्राट न्यासा कंपनीला मिळावं, यासाठीही सौरभनं लायझनिंग केलं. सौरभनं शिक्षण परिषदेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःची कंपनी स्थापन केली.
सौरभच्या विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 2021च्या TET परीक्षेचं कंत्राट मिळालं. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडा, असं सांगितलं जायचं. उत्तरपत्रिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या आणि त्यांना गुण दिले जायचे.
केवळ टीईटीच नव्हे, तर आरोग्य भरती परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षेतील पेपर लीक करण्यामध्येही ही सगळी सूत्रधार टोळी एकत्रित संगनमतानं काम करायची.
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या महाभागांना खरं तर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा का लावू नये, असा सवाल आता उपस्थित होतोय.
बोगस परीक्षार्थींना पास करण्यासाठी नेमका काय रेट होता, प्रत्येक परीक्षार्थीकडून सौरभ त्रिपाठीसह या बड्या अधिकाऱ्यांनी किती पैसे उकळले, परीक्षा घोटाळ्यातून या दलालांनी कोट्यवधी रुपयांची माया कशी जमवली? या सगळ्याचा पर्दाफाश झी २४ तास पुढच्याच रिपोर्टमध्ये करणार आहे.