अनिकेत पेंडसे, झी मीडिया, मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेना पुरती खिळखिळी करुन ठेवलीय. 40 आमदार, 12 खासदार, शेकडो माजी नगरसेवक, हजारो पदाधिकारी शिंदेंसोबत आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदेंचा डोळा आहे, शिंदे गट शिवसेना भवन बांधतोय. खरी शिवसेना आमचीच असा दावाही करतोय. त्यात आता शिंदे गटानं मुंबई महापालिकेच्या दिशेनं कूच केलीय, मुंबई महापालिका शिवसेनेचा श्वास आहे. त्यामुळेच मुंबई हातून गेली तर ठाकरेंचं नाक कापलं जाईल आणि शिवसेना संपेल असं बोललं जातंय. पण “शिवसेना संपली, शिवसेना संपेल“ असं पहिल्यांदाच बोललं जात नाहीये. शिवसेनेच्या इतिहासात..राजकीय प्रवासात आजवर असे सहा प्रसंग आले जेव्हा ‘शिवसेना संपली’ असं बोललं गेलं. कधी कुत्सितपणे तर कधी काळजीनं..पण प्रत्येक वेळी झालं उलटच. कोणते आहेत हे 6 प्रसंग ज्यात शिवसेना संपणार असं बोललं गेलं पण झालं उलटच, शिवसेनेनं आपल्यावरचे वार कसे पलटवले, इतक्या लोकांनी कारस्थानं केली पण शिवसेना का संपली नाही...सविस्तरपणे जाणून घेऊयात...
उद्धव ठाकरे नुकतेच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते, त्याच्या काही काळातच राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राज ठाकरेच शिवसेनेचे उत्तराधिकारी होते पण उद्धव यांना नेतृत्व दिलं गेलं, राज ठाकरेंकडे बाळासाहेबांचा करिष्मा आहे, बाळासाहेबांसारखी हुबेहुब शैली आहे, त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे मवाळ आहेत, त्यांच्याकडे वत्कृत्व नाही, अशी टीका तेव्हा सर्रासपणे झाली. राज यांच्यासोबत आमदार-खासदार गेले नाहीत पण शिवसेनेचा पारंपरिक मराठमोळा-हिंदुत्ववादी मतदार राज यांनाच मत देईल असं भाकित वर्तवलं गेलं..कारण मुंबईसह 18 महापालिका तोंडावर होत्या. पण झालं उलटच. 2007 ला मुंबईसह मुंबई महानगरक्षेत्रातल्या बहुतेक महापालिका शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जिंकल्या. ना उद्धव संपले, ना सेना संपली उलट वाढत गेली.
2009 ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना मागे खेचणारी होती. कारण स्थापनेनंतर शिवसेनेला विधानसभेत सर्वात कमी जागा याच निवडणुकीत मिळाल्या होत्या. अर्थात याला कारण होती मनसे आणि मनसेनं हाती घेतलेला आक्रमक मराठीचा मुद्दा. शिवसेनेला फक्त 45 जागा मिळाल्या होत्या, मनसेचे पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आले होते. 50 हून अधिक ठिकाणी मराठी मतांचं विभाजन झालं आणि शिवसेनेऐवजी ताकद नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला होता. मराठी मतांच्या विभाजनामुळेच शिवसेनेची दयनीय अवस्था झाली, असा आरोप शिवसेनेकडून मनसेवर त्याच काळात सुरु झाला.
उद्धव यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व आलं होतं तेव्हा दबक्या आवाजात टीकेचा एक ट्रेंड होता किंवा कुजबूज होती की, बाळासाहेबानंतर शिवसेना संपणार..! 17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेबांचं निधन झालं. मनसे तेव्हा फॉर्ममध्ये होती, मराठीच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरुन खळ्ळ-फट्याक आंदोलन ऐन भरात होतं, त्यामुळे शिवसेनेचं आता काही खरं नाही, शिवसेना संपली असं बोललं गेलं पण झालं उलटच. राज्यातल्या अनेक महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकला, उद्धव ठाकरेंनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जबदरस्त कमबॅक केलं.
2014 लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपला प्रत्येक राज्यात आपण स्वबळावर लढलं पाहिजे, ताकद वाढवली पाहिजे असं वाटायला लागलं होतं किंवा तसा आत्मविश्वास आला होता. मोदींच्या करिष्म्यावर आणि नावावर देशातली कुठलीही निवडणूक आपण जिंकू शकतो इतका आत्मविश्वास भाजपला आला होता. जागावाटपात ठाकरे-भाजपत बिनसलं आणि 25 वर्षांची शिवसेना-भाजप युती तुटली. मुंडे-महाजन-गडकरी-ठाकरेंनी सांभाळलेली युती तुटल्यानं विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची सेनेची दोन दशकातली ती पहिलीच वेळ होती. पण शिवसेनेनं स्वबळावर लढून 63 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचा तो बेस्ट परफॉर्मन्स म्हणावा लागेल कारण 99 साली शिवसेनेनं भलेही 69 जागा जिंकल्या होत्या पण त्या युतीत जिंकल्या होत्या. बाळासाहेबांच्या निधनानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक आणि तीही स्वबळावर...अशा परिस्थितीत सेना ती निवडणूक लढत होती. या निवडणुकीत भाजपच्या झंझावातासमोर सेना टिकणार नाही असं वाटत होतं पण सेना टिकलीही आणि राजकीय आय़ुष्यातला बेस्ट परफॉर्मन्सही दिला..
2014 ला भाजप-शिवसेना जरी निवडणूक वेगवेगळे लढले असले तरी काही महिन्यातच दोघेही पुन्हा एकत्र आले. सेना सत्तेत सामील झाली तरी दोघांचे खटके उडत होते. राज्यात स्वबळावर लढून भाजपनं 123 जागांवर मुसंडी मारली होती. त्यामुळे राज्यातलाच स्वबळाचा पॅटर्न मुंबईसह इतर महापालिकांसाठी राबवायचा असं भाजपनं ठरवलं. विशेषत सेनेचा ऑक्सिजन समजली जाणाऱ्या मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई मनपा भाजप स्वबळावर लढली. मुंबई जिंकली तर ठाकरेंचं नाक कापलं जाईल हे भाजपला माहिती होतं. भाजप पूर्ण ताकदीनं उतरलं.. मग मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनीही शड्डू ठोकला. मी कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला. मुंबईसाठी भाजपनं पूर्ण ताकद लावली. निकाल लागला तेव्हा असं वाटत होतं की मुंबई सेनेच्या हातातून गेली पण निकाल पूर्ण हाती आला तेव्हा शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. भाजपनं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना घाम फोडला होता ते पाहता शिवसेना संपली अशी चर्चा सुरु झाली होती पण त्याचवेळी शिवसेनेनं मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले आणि मुंबईची सत्ता बळकट केली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीतही सेनेला यश मिळालं. पडद्यामागून सूत्रं हलली आणि भाजपनं सेनेला मुंबईसाठी बिनशर्त पाठिंबा देऊ केला. सेना संपली नाही तर उलट बळकट झाली.
2014 पासून शिवसेना-भाजपत तुतू-मैमै सुरु होतं पण 2019 सारे मतभेद विसरुन सेना-भाजप एकत्र लढले. निवडणुकीपूर्वी अमित शहा मातोश्रीवर आले होते. मोदींनी युतीसाठी सभा घेतल्या होत्या. युतीला लोकांनी भरघोस मतदान केलं पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन सेना-भाजपचं बिनसलं. भाजप-सेनेच्या बैठका सुरु असताना अचानक पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला आणि त्यानंतर सेना सावध झाली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी संधान साधलं आणि थेट मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं. 2014 ला स्वबळावर लढून सेनेला 63 जागा मिळाल्या होत्या तर 2019 ला युतीत लढून 56.. तर भाजपला 2019 ला 105 जागा मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष भाजप विरोधात बसला आणि सेनेचा मुख्यमंत्री ज्यांच्याविरोधात लढले त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर झाला. तेव्हाही सेना संपली असं बोललं गेलं पण सेना संपली नाहीच उलट 2014 नंतर सर्वात जास्त काळ सत्तेत राहिलेला पक्ष म्हणून शिवसेनेची नोंद झालीय. आत्ताही एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना संपली, ठाकरे संपणार वगैरे चर्चांना उधाण आलंय. पण शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, मजबूत पाया, निष्ठावान कार्यकर्ते आणि इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा शिवसेनेला हादरे बसतात तेव्हा तेव्हा शिवसेना उभारीच घेते हा इतिहास आहे कारण कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षाला वाहून घेतलेले, बाळासाहेब ठाकरे या नावाशी निष्ठा असणारे आणि उद्धव ठाकरेंसाठी कुणालाही अंगावर घेणारे शिवसैनिक शिवसेनेचा ऑक्सिजन आहेत. असोत.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करुन सांगा. लेख आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर शेअर करायला विसरु नका.