मुंबई : केवळ १०% हृद्य सुरू असलेल्या आराध्याला लवकरात लवकर हृदय मिळावे याकरिता सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ऑनलाईन मोहिम केली, प्रार्थना केली. अखेर सार्यांची ही प्रार्थना फळाला आली. सप्टेंबर महिन्यात आराध्यावर यशस्वीरित्या हृद्यप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.
हृद्यप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात असलेली आराध्या आता जनरल वॉर्डमध्ये आली. आराध्याच्या कुटुंबियांसह डॉक्टरांनीही हा क्षण सेलिब्रेट केला. या क्षणाचा खास व्हिडिओ आराध्याच्या वडिलांनी त्यांंच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.
आराध्याला लवकरच हॉस्पिटलमधून सुट्टी मिळणार आहे. तसेच आयुष्यभरासाठी आराध्याला इम्यूनोसप्रेसंट औषधं घ्यावी लागणार आहेत. आराध्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला तळोजाच्या नव्या घरी घेऊन जाणार असल्याचे. तसेच तिच्या प्रकृतीच्या दृष्टीने तेथे घरात काही बदल केल्याची माहितीही आराध्याचे वडील योगेश मुळे यांनी माय मेडिकल मंत्राला दिली आहे.
गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ आराध्या तिच्या रक्तगटाशी, वजनाशी मिळत्याजुळत्या हृद्याच्या शोधात होती. अखेर १४ महिन्यांच्या सोमनाथ शहा या ब्रेनडेड मुलाने तिला हृद्यदान केले. सोमनाथ खेळता खेळता शिडीवरून खाली पडला. मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.