...तर पोलिसांवरच होणार कारवाई! पोलीस महासंचालकांनी जारी केले आदेश

अप्पर पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत

Updated: Sep 3, 2022, 07:43 PM IST
...तर पोलिसांवरच होणार कारवाई! पोलीस महासंचालकांनी जारी केले आदेश title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी (traffic police) ई-चलानच्या माध्यमातून दंड (challan) ठोठावत असतात. काही वेळा स्थानिक पोलिसही नियम मोडणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करताना दिसतात. यावेळी पोलीस कर्मचारी त्यांना दिलेल्या डिव्हाईसमधून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतात. या डिव्हाईसमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचा फोटो काढला जातो.

मात्र आता यावरुनच पोलिसांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. काही वेळा वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर  केला जातो. त्यामुळे आता अशा पोलिसांवर कारवाई होणार आहे. जर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढताना कोणी खाजगी मोबाईलचा वापर केला तर कारवाई होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी यासंदर्भात पत्रक काढलं आहे.

"वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करण्याच येईल,' असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत.