दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : जिममध्ये स्टिरॉईड घेतल्यानं मुंब्रा आणि कल्याण इथे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यातील सर्व जिमची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विधानसभेत बुधवारी ही घोषणा केली. येत्या सहा महिन्यांत जिमची तपासणी केली जाणार आहे. थोड्या कालावधीत पिळदार शरिरयष्टी होण्यासाठी जिममध्ये मोठ्या प्रमाणात स्टिरॉईड अर्थात उत्तजेक द्रव्य दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.
स्टिरॉईडच्या सेवनाने तरुणांच्या शरीरावर याचा विपरित परिणाम होतो. अपंगत्व, नपुंसकता याबरोबर काही वेळा हे द्रव्य घेणाऱ्या व्यायामपटूचा मृत्यूही होत असल्याचं समोर येत आहे. शिवाय स्टिरॉईडची ऑनलाईन विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा आणता येईल का, हे विधानसभेत यासंदर्भात बुधवारी 'लक्षवेधी' मांडण्यात आली होती. या लक्षवेधीला अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उत्तर दिलं.
तरुणाईचा स्टिरॉईडकडे वाढता कल घातक
अनेक ऑनलाईन साईट्सवर ऑफर्सचं आमिष दाखवून स्टिरॉईडची विक्री करण्यात येते. कमी वेळात पिळदार शरीर बनवण्यासाठी तरुण सऱ्हास याचा वापर करतात. पण, या औषधांच्या दुष्परिणामांची पुसटशी कल्पनाही अनेकांना नसते. पिळदार शरिर कमावण्यासाठी डाएट ऐवजी अशा औषधांचा चुकीच्या पद्धतीने आधार घेतला जातो.
गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी व्यायामशाळा, जीम, फीटनेस सेंटर्स सुरु झाले आहेत. ज्यापैकी कित्येक ठिकाणी जाऊन अनेक तरुण पिळदार शरीर बनवण्याचे स्वप्न बघतात आणि स्टेरॉइजच्या विळख्यात अडकतात.