ठाकरे सरकारच्या संकुचित राजकारणामुळे अश्विनी भिडेंची बदली- सोमय्या

अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रोच्या कामाला गती दिली.

Updated: Jan 22, 2020, 08:40 AM IST
ठाकरे सरकारच्या संकुचित राजकारणामुळे अश्विनी भिडेंची बदली- सोमय्या

मुंबई: ठाकरे सरकारने संकुचित राजकारणापोटी मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून अश्विनी भिडे यांना दूर केले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अश्विनी भिडे यांच्या कार्यकाळात मुंबई मेट्रोच्या कामाला अभूतपूर्व गती आली होती. मात्र, ठाकरे सरकारने केवळ राजकारण आणि संकुचित वृत्तीपोटी त्यांची बदली केली. यामुळे आगामी काळात मुंबईचे मोठे नुकसान होईल, अशी भीती किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. सोमय्या यांच्या या विधानामुळे आरेतील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

मुंबई मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, अश्विनी भिडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या होत्या. त्यावेळी भाजपनेही मौन बाळगून अप्रत्यक्षपणे अश्विनी भिडे यांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु, आदित्य ठाकरे यांनी कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्याच्या भिडे यांच्या भूमिकेस विरोध केला होता. तसेच सत्तेत आलो, तर आरेतील झाडे तोडणाऱ्यांना बघून घेऊ, असेही त्यांनी म्हटले होते. 

आरेतील कारशेडचे काम थांबले तर.... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा

यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. यावरूनही भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता शिवसेनेने थेट आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.