मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. याचे परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतात. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडी भक्कम ठेवण्याचं आव्हान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे.
गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबन न घेतल्याने नाराजी आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गोव्यात भाजपाल दमदार यश मिळाल्याने आघाडी अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर लगेचच शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला कानपिचक्या दिल्यायत. हा पराभव काँग्रेसला झटका देणारा आहे, असं पवारांनी म्हटलंय. तर काँग्रेसनं धोरणांचा विचार करावा, असा सल्ला राऊतांनी दिलाय.
तर काँग्रेसचा पराभव अत्यंत निराशाजनक असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. संघटनात्मक निर्णय चुकल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलं असून या पराभवाचा महाराष्ट्रात मात्र फरक पडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे पाच राज्यांतली निवडणूक निकालामुळं भाजपचं मनोधैर्य उंचावलंय. यूपी तो झाँकी है, महाराष्ट्र बाकी है, असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पोपटाचा प्राण महानगरपालिकेत असा शिवसेनेला टोला लगावत चंद्रकांत पाटील यांनी पुढचं टार्गेट मुंबई महानगरपालिका असल्याचं म्हटलं आहे.
तर बोरुबहाद्दर आणि युवराज गोवा आणि गोरखपूरमध्ये गेले, तिथे बदल आणू म्हणाले, पण नोटाला जेवढी मतं आहेत त्यापेक्षा कमी मतं शिवसेनेला मिळाली, लाज वाटली पाहिजे शिवसेनेला असं बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईतही परिवर्तन होणार, याची लाईट गुल होणार, मोदी है तो मुमकीन है, मुंबईतही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतील असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
गोव्यात शिवसेनेला मोठा फटका
गोव्यात 40 जागांच्या महासंग्रामात यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढत होते. गोव्यात शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही तळ ठोकला होता. गोव्यातील पारंपारिक राजकारण, कोकणी माणूस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांसोबत असलेले संबंध अधोरेखित करत शिवसेना मैदानात उतरली होती. सेनेच्या प्रचारासाठी कोकणातील नेत्यांनीही उपस्थिती लावली. मात्र, शिवसेनेला गोव्यात खातं उघडता आलं नाही. शिवसेनेसाठी हा मोठा दणका मानला जातोय. शिवसेनेच्या कामगिरीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय. आमची लढाई नोटासोबत होती असा टोला फडणवीसांनी लगावलाय.