अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : देशातल्या युवकांना लष्करी सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालीय. केंद्र सरकारने लष्करी सेवेची अग्निपथ भरती योजना (Agneepath scheme launch) जाहीर केली आहे.
आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये दाखल होऊन सेवा बजावण्याची इच्छा तर बहुतेकांची असते पण निवड प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते. त्यामुळे प्रयत्न करूनही अनेकांची लष्करी सेवेची संधी हुकते. मात्र आता भारतीय लष्करात दाखल होण्याची, 4 वर्षे सेवा बजावण्याची आणि आपला करियर ग्राफही उंचावण्याची संधी युवकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे नौदलातर्फे अग्निवीर म्हणून तरूणींचीही संधी होईल.
अग्निपथची वैशिष्ट्ये काय?
या योजनेअंतर्गत तरूणांची 4 वर्षांसाठी लष्करात भरती होणार आहे. 4 वर्षांच्या सेवाकाळात युवकांना आकर्षक वेतन मिळणार आहे. 4 वर्षांनंतर निवृत्ती असेल तसंच उज्ज्वल भविष्यासाठी संधीही दिली जाईल. 4 वर्षांनंतर सेवा निधी पॅकेज लष्करातर्फे दिलं जाणार आहे. काही जणांना सेवेत कायम ठेवलं जाणार आहे.
17.5 वर्षे ते 21 वर्ष वयोगटातील युवकांची भरती होणार आहे. 10 आठवडे ते 6 महिन्यांचं लष्करी प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल. 10 वी, 12 वीचे विद्यार्थी अग्निवीर भरती योजनेसाठी अर्ज करू शकतात. 90 दिवसांत अग्निवीरांची भरती होणार आहे. देशात परीक्षा, मेरिटच्या आधारावर भरती होणार आहे. सेवाकाळात शहीद झाल्यास कुटुंबाला 1 कोटी रूपये व्याजासह मिळतील. तर अग्निवीर सेवाकाळात अपंग झाल्यास 44 लाख निधी दिला जाईल.
आर्मी नेव्ही एअरफोर्स या स्पेशलाईज्ड सेवा आहेत. ही केवळ नोकरी नाही, तर इथे थेट जिवाशीच गाठ असते. त्यामुळे निवड प्रक्रिया काटेकोरपणे केली जाते. नवी योजना राबवताना या काटेकोर निवड प्रक्रियेशी तडजोड होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.