शिवरायांची 'जगदंबा' तलवार इंग्लंडला गेली कशी, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा खुलासा

तलवारीचा प्रवास नेमका कसा झाला, पाहा काय सांगतात बाबासाहेब....   

Updated: Aug 12, 2021, 10:08 PM IST
शिवरायांची 'जगदंबा' तलवार इंग्लंडला गेली कशी, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा खुलासा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्र दैवत. जाणता राजा अशी ओळख असणाऱ्या या राजाला सानथोर सारेच मानाचा मुजरा करतात. अशा या राजाची आठवण म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्राचे पडसाद थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वाच्या पाऊलखुणा आजही अस्तित्त्वात आहेत. यापैकी काही ठेवा राज्यात असून, काही अनमोल ठेवा मात्र परदेशात पोहोचला आहे. कसा? याचं उत्तर दिलं आहे खुद्द शिवशाहीर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी. 

बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच 'झी24 तास'चे संपादक निलेश खरे यांना दिलेल्या मुलाखतीत हा मोठा उलगडा केला. शिवरायाची 'जगदंबा' तलवार इंग्लंडला कशी गेली, याचा खुलासा बाबासाहेबांनी केला आहे. करवीर संस्थानकडून इंग्लंडच्या राजाला ही तलवार आहेर म्हणून दिली होती. 

ही मानाची 'जगदंबा' तलवार कधी परत आणण्याचा प्रयत्न केला गेला होता का, असा प्रश्न विचारलं असता, त्याचं उत्तर देत बाबासाहेब म्हणाले, 'काही थोर नेते मंडळी, अधिकारी मंडळींनी ही जगदंबा तलवार परत आणण्याचे प्रयत्न केले होते. पण, अद्यापही ही तलवार परत आलेली नाही. 7 वा एडवर्ड़ 1875 च्या सुमाराला भारतात आला, त्यावेळी त्याला आहेर देण्याच्या पद्धतीखातर कोणी सोन्याचे तर कोणी हिऱ्याचे आहेर दिले. कोणी माणकं आणि कोणी कापडही दिली. यावेळी छत्रपतींकडचा म्हणजे कोल्हापूरचा आहेर काय जाणार याची चर्चा असतानाच बर्वे नावाच्या दिवाणांनी शिवरायांच्या तलवारीचा पर्याय सुचवला.'

महाराजांच्या तलवारीचा हा प्रवास ऐकताना यावर विश्वास ठेवणं कितीही कठीण वाटलं तरीही हेच सत्य असून, बाबासाहेबांनी या मुलाखतीमध्ये आणखी कोणती अनमोल माहिती सर्वांसमोर आणली आहे हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता ही संपूर्ण मुलाखत फक्त 'झी24 तास'वर नक्की पाहा.