मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रविवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती पुढे येत नव्हती. मात्र, आता छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, थोड्याचवेळा ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जातील. याठिकाणी ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधतील. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ परतल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राज्यातील प्रमुख ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय, नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे.
छगन भुजबळ हे शिवसेना प्रवेशावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचणार असल्याचेही सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या बैठका आणि सभांकडे भुजबळांनी पाठ फिरवली आहे. भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भुजबळ राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे भुजबळांनी पक्ष सोडला तर तो राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील सभेसाठी देखील भुजबळ गैरहजर होते. भुजबळांची प्रकृती ठिक नसल्याने ते निफाडच्या सभेला गैरहजर राहिले असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. मात्र त्याच वेळी भुजबळ आपल्या येवला मतदारसंघात विविध कार्यक्रमात व्यस्त दिसत होते. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीपासून दूर जात असल्याची चर्चा त्यांच्या येवला मतदारसंघात आहे.