मुंबई : सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खुर्चीवर नाही तर व्यासपीठावर बसवण्यात यावं, अशी मराठा मोर्चा समन्वयकांची मागणी होती. यावरुन बैठकीत गोंधळ झाला. मात्र या गोंधळानंतर संभाजीराजे यांनी, 'माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्त्वाचे' असल्याचे मत मांडले आहे.
'माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे' असं ट्विट करत, संभाजी राजे यांनी आपल्याला समाज महत्त्वाचा आहे, सारथी महत्त्वाची आहे, असं म्हटलं आहे.
माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!
छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत.
स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. pic.twitter.com/vjroOAyAoh— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 9, 2020
सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत, छत्रपती संभाजीराजे भोसले तिसऱ्या रांगेत बसले होते. यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना तिसर्या रांगेत बसवल्याचा आक्षेप घेतल्यानंतर, विजय वड्डेटीवार आणि अजित पवार व्यासपीठावरून खाली आले. संभाजीराजे तुम्ही व्यासपीठावर बसा आम्ही खाली बसतो अशी विनंती या दोघांनी केली. कारण व्यासपीठावर कोरोनामुळे तीनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु संभाजी राजेंनी मी समाजासाठी आलो आहे, समाज महत्त्वाचा आहे, सारथी महत्त्वाची आहे. समाजासाठी मान-अपमान न मानता बैठक करुन त्यावर निर्णय महत्त्वाचा असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटंल आहे.