सर्वांनी शांतता राखून समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा - अशोक चव्हाण

भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.

Updated: Jan 2, 2018, 02:37 PM IST
सर्वांनी शांतता राखून समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा - अशोक चव्हाण title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.

अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

‘पोलिसांचे दुर्लक्ष’

दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगाव येथे हजारो लोक येतात अभिवादन करतात. यंदा २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोक मोठ्या संख्येने येणार होते. पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. आरएसएसशी संबंधित लोकांनी चार पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थीती बिघडवण्याचे काम केले होते.

याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळेच पुण्यातून आलेल्या काही समाजकंठकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली अशी माहिती स्थानिकांकडून मिळतेय. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.

‘राजकीय डाव हाणून पाडा’

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.