Covid intranasal vaccine : राज्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नाकावाटे घेण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा मुंबईत आजपासून प्रारंभ करण्यात येत आहे. तसेच 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे. मुंबईत नाकावाटे इन्कोव्हॅक लस घेता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र या प्रमाणे 24 लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरण आजपासून सुरु करण्यात आले आहे. पालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे आणि त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे.
कोविड-19 लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहेत. कालअखेर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 इतकी आहे. यामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 8 लाख 93 हजार 679 आहे. तर, दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 98 लाख 15 हजार 20 इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 14 लाख 88 हजार 296 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र या प्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड - १९ प्रतिबंधक लसीकरण उद्या शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.
६० वर्षे… pic.twitter.com/h74v8vxCjp
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 27, 2023
राज्य शासनाच्या सूचनेनुसार आजपासून इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही लस 60 वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील 24 ठिकाणी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लस स्थळ नोंदणी अर्थात तात्काळ नोंदणीद्वारे देण्यात येईल. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांची नावे आणि पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावर दररोज देण्यात येणार आहेत. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या (Corona Update) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढू लागलेत. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्ण 1500 पेक्षा जास्त आहेत. याआधी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली होती.