मुंबई : 'डोंगरी ते दुबई' पुस्तकात झैदीने आपल्या चर्चित पुस्तकात म्हटलं आहे, दुबईत दाऊद इब्राहिमने एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं, यात शहरातील मोठ मोठ्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं, छोटा राजन देखील त्या पार्टीत जाण्यासाठी तयार होत होता. तेव्हाच एक फोन आला, छोटा राजनने फोन उचलला, तेव्हा एका अज्ञात माणसाचा फोन आला, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है". 'डोंगरी टू दुबई' पुस्तकात उल्लेख आहे, 'छोटा राजनने फोन ठेवला आणि दुबईत भारतीय दुतावासाची वाट धरली, तेथे त्यांची चर्चा एका रॉ ऑफिसरशी झाली, यानंतर दिल्लीला फोन लावण्यात आला, यानंतर काही तासांनी छोटा राजन काठमांडूच्या फ्लाईटमध्ये बसला आणि काठमांडूहून थेट मलेशियात निघून गेला.
दुबईतून आणि विशेष करून डी गँगमधून छोटा राजन गायब झाल्याने, सर्वाधिक आनंद झाला आणि डी गँगमध्ये सर्वाधिक फावलं ते छोटा शकीलचं. कारण आता जो छोटा राजन दाऊदचा डावा हात मानला जात होता, त्याची जागा आता छोटा शकीलने घेतली. या नंतर पुढील काही वर्ष छोटा राजन लपून बसला होता.
छोटा राजन लपत लपत क्वॉलालांम्पूर, कंम्बोडिया, आणि इंडोनेशियात लपत फिरत होता. पण राजनला सर्वात सुरक्षित जागा ही बँकाक वाटली. छोटा राजनने मोबाईलनंबरपासून, घराचं ठिकाण, पत्ता लपवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नानंतर २००० साली छोटा राजनचा पत्ता छोटा शकीलला लागला होता. राजनच्या अपार्टमेंटवर १४ सप्टेंबर २००० साली काही लोकांनी हत्यारांसह हल्ला केला, यात छोटा राजन वाचला आणि एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ही बातमी भारतात पोहोचल्यानंतर समजलं, छोटा राजनचं लपण्याचं ठिकाण बँकॉक आहे.
काही दिवसानंतर हॉस्पिटलमधून छोटा राजन गायब झाल्याची बातमी आली. कारण छोटा राजनला माहिती मिळाली होती की, हॉस्पिटलमध्ये देखील त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. यानंतर छोटा राजनने देखील छोटा शकीलच्या २ गुंडांची हत्या केली.