दिपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : आपली सतत बडबड करण्याची सवयच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचवेल असा विचारही तिनं कधी केला नव्हता... पण आपल्या बिनधास्त बोलण्याच्या कलेनंच ती आज देशाची सुप्रसिद्ध रेडीओ जॉकी बनलीय... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये टॉप क्लास आरजे मलिष्काबद्दल...
मलिष्का... मुंबईची राणी... २००३ मध्ये तिनं रेडिओ जॉकी म्हणून काम करायला सुरुवात केली. आज मलिष्का सर्वाधिक यशस्वी आरजे म्हणून ओळखली जाते. मुंबई आणि मुंबईकरांची नस अन् नस ती ओळखते... आपल्या मनोरंजनातून ती मुंबईकरांच्या समस्या अत्यंत ठामपणे मांडते... नुकताच मलिष्काचा 'मुंबई, तुझे बीएमसीपे भरोसा नही क्या' हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय वादळ उठलं... पण आपण जे बोललो त्यात काहीच चुकीचं नसल्यानं माफी का मागायची ही भूमिका मलिष्कानं घेतली.
व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळी तिला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला. पण यामागे आहे प्रचंड मेहनत... आपण 'रेडिओवर काम करत नसून मी रेडिओ जगते' इतकं मलिष्का आणि रेडिओचं नातं घट्ट आहे.
मलिष्काचे चाहते देशभरातून फोन करतात. कधी कधी तर मी आत्महत्या करत आहे असं सांगणारी तिला फोनही येतात. अशा वेळी समुपदेशन करायचं कामही करावं लागतं.
मलिष्का आता लवकरच मोठ्या पडद्यावरही एन्ट्री घेणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच मलिष्काचा 'सुलू' सिनेमा रिलीज होतोय. यात तिनं विद्या बालनसोबत काम केलंय. सिनेमात तिची आरजेचीच भूमिका असणार आहे. त्यामुळे आरजे ते अभिनेत्री असा टप्पा तिनं गाठलाय.
मलिष्काला कायमच तिच्या कुटुंबाचं सहकार्य लाभलंय. मलिष्का लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं. पण तिच्या आईनं कधीच मीडियाच्या या क्षेत्राला विरोध केला नाही.