रुग्णालयांनीही आता सज्ज राहावे... वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

वैद्यकीय विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न 

Updated: Jan 6, 2022, 06:11 PM IST
रुग्णालयांनीही आता सज्ज राहावे... वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना title=

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी सज्ज राहावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

रुग्णालयांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच, इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे. येणाऱ्या काळात सर्व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावीत असेही ते म्हणाले.

मंत्रालयात आज वैद्यकीय शिक्षण मंत्राच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा असावा. त्याचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, असे ते यावेळी म्हणाले.

डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक तसेच अन्य कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने बुस्टर डोस देण्यासाठी अधिष्ठाता यांनी तातडीने प्रयत्न करावेत, अशी सुचना त्यांनी केली.

कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. व्हेंटिलेटर्स, सीटी स्कॅन मशीन, एमआरआय मशीन्स, ऑक्सीजन मशीन्स सर्व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची चाचपणी तातडीने करुन घ्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.