नव्या संकल्पनेच्या विमानतळामुळं पालघरकरांच्या जमिनींचे भाव वधारणार

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पडणारा ताण, नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यास होणारा विलंब याचा पर्याय म्हणून पालघरमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे.  

Updated: May 11, 2022, 12:50 PM IST
नव्या संकल्पनेच्या विमानतळामुळं पालघरकरांच्या जमिनींचे भाव वधारणार title=

मुंबई : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया आणि नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू आहेत. तर, देशातील प्रमुख तीर्थस्थळ शिर्डी येथील विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे.

राज्यात विमानसेवेची अशी उड्डाणे सुरु असताना आता पालघरमध्येही नवे विमानतळ उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. या विमानतळाच्या सर्वेक्षण उभारणीला गती देण्याचे आदेश देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विमानतळास हिरवा कंदील दाखविला आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पडणारा ताण तसेच नवी मुंबई येथे विमानतळ सुरू होण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन पालघरमध्ये हे विमानतळ उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

समृद्धी महामार्गामुळे नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमान वाहतूकीस चालना मिळेल. त्यामुळे या भागातील प्रस्तावित प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर - रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरण, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील विमानसेवांच्या कामगिरीबद्दल ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केले.

लंडनच्या धर्तीवर पालघरमध्ये हे विमानतळ उभारण्यात येणार आहे. छोट्या विमानांसाठी हे विमानतळ उभारण्यात येणार असून ते पूर्णतः सॅटेलाईट असणार आहे. या विमानतळामुळे पालघरमधील जमिनीचे भाव आणखीनच वधारणार आहेत.

दरम्यान, पावसाळ्यापूर्व कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सहा तास बंद ठेवलेल्या दोन्ही धावपट्टय़ा मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विमान सेवांसाठी खुल्या करण्यात आल्या.

देखभाल, दुरुस्तीच्या कामानंतर मुंबई विमानतळावरील देशांर्तगत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.