प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : जागतिकीकरणाच्या रेट्यात भारतात पिझ्झा, बर्गर यांनी घुसखोरी केली. भारतात हे फास्ट फुट लोकप्रियही झालं. पण त्यातही भारतीय खाद्यपदार्थांची लोकप्रियता कमी झाली नाही. भारतात बिर्याणी आणि मसाला डोसा सर्वात लोकप्रिय असल्याचं एका पाहणीत आढळून आलंय. भारत हा खंडप्राय देश आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या सवयी आहेत.
खाण्यातली भारतीयांची राष्ट्रीय आवड काय तर ती आहे चिकन बिर्याणी. भारतीय चिकन बिर्याणी खाण्याचे शौकीन असल्याचं एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या पाहणी अहवालातून समोर आलंय. भारतात एका मिनिटाला ९५ बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या जातात.
तशी बिर्याणी ही पर्शियातून आलेला खाद्यपदार्थ आहे. मोगलांनी तो भारतात लोकप्रिय केला. आज भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या चवीच्या बिर्याणी चाखायला मिळतात. अगदी साध्याभातापासून बासमती भातापर्यंत कोणताही भात बिर्याणीची चव आणि लज्जत वाढवतो.
भारतातल्या प्रत्येक शहरातली बिर्याणी तिची वेगळी चव राखून आहे. बिर्याणी खालोखाल भारतात मसाला डोसा सर्वाधिक खाल्ला जातो. मसाला डोसा हा तसा दक्षिणेकडील राज्यातील खाद्यपदार्थ पण आज भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला डोसा खायला मिळू शकतो.
बिर्याणीशिवाय भारतीयांना डोसा, डाळखिचडी, दहीभात, मेथी मलाई पनीर, इडली, सांबरवडा, गुलाबजाम आवडत असल्याचं सर्व्हेक्षणातून स्पष्ट झालं आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात बर्गर पिझ्झानं भारतात शिरकाव केला. पण भारतीयांच्या मनात अजूनही देशी पदार्थांनीच घर केल्याचं हा अहवाल सांगतो.