मुंबई : भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय. मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येते आहे. मंजुला शेट्येची हत्या जेलमध्ये वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला आहे.
इंद्राणी मुखर्जी ही तिचीच मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असून भायखळा तुरुंगात न्यायलयीन कोठडीत भोगते आहे. मारहाण करत्या वेळी महिला पोलिसांनी मंजुलाच्या गुप्तांगावर रॉडनं मारहाण केली. मंजुलाची हत्या केल्यावर तुरुंगातला वीज पुरवठा खंडीत करून इतर महिला कैद्यांवर लाठीमार करण्यात आल्याचंही इंद्राणीनं कोर्टात सांगितलं आहे.
इंद्राणीनं यावेळी तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रणही दाखवले. त्यानंतर कोर्टानं तिच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत. मंजूला शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा जेलच्या अधीक्षक मनिष पोखरकर यांच्यासह ६ पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही.