मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितले आहे. २०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एखाद्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणं हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. असं आव्हाड म्हणाले आहेत.
ट्विटरवर ट्विट करत त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 'ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला, देवासमान आई हिरावून नेली, अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे