मुंबई : लालबागचा राजाला लोकलने येताना, मध्य रेल्वेच्या करीरोड आणि चिंचपोकळी स्टेशनला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी पादचारी पुलांवर लोकांच्या रांगा लागतात, एक एक पाऊल सावकाश टाकात वाट काढावी लागते. ही गर्दी टाळण्यासाठी आता तुम्हाला एक नवीन पर्याय मिळाला आहे. यासाठी तुम्ही करीरोड पुलावरील आर्मी ब्रीजचा वापर करू शकतात.
करीरोड स्टेशनवर या वर्षी गर्दी टाळण्यासाठी नव्यानेच आर्मी ब्रीज झाला आहे. हा आर्मी ब्रीज करीरोड स्टेशनच्या मध्यभागी आहे, तो पूर्व (इस्ट)ला निघतो. म्हणजे सीएसटीच्या दिशेला जर तुम्ही तोंड करून उभे राहिलात तर तुमच्या डाव्या बाजूला, आर्मी ब्रीज लिहिलेला, गडद हिरव्या रंगाचा पूल तुम्हाला दिसेल. हा पूल तुम्हाला थेट लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणजेच गणेशोत्सवातील सर्वात जास्त गजबजलेल्या भागात सहज घेऊन जातो.
आर्मी पूलाचा वापर अजून अनेकांना माहित नसल्याने, करीरोड स्टेशनवर याविषयीची पत्रकं लावण्यात आली आहेत. तेव्हा करीरोड स्थानकावरून लालबागचा राजाला जाण्यासाठी हा नवीन मार्ग आहे, गर्दी टाळण्यासाठी या मार्गाचा तुम्ही जरूर वापर करू शकतात. या पुलाचा मार्ग थेट लालबागजवळील श्रॉफ बिल्डिंगच्या चौकापर्यंत जातो.